Monday 20 October 2014

१९५६ च्या नोवीमीर मध्ये प्रसिद्ध झालेल्या सिमॉन किर्सानोवच्या 'दि सेवेन डेज ऑफ दि वीक' या कवितेतील काही भाग. ही कविता इंटरनेट्वर शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु ती सापडली नाही. प्रस्तुत भाग बरयाच वर्षांपुर्वी कुठल्याशा पुस्तकाच्या प्रस्तावनेतुन घेतला आहे.
प्रस्तुत कवितेत कवी हा कल्पित भविष्यकाळातल्या रशियामधला ह्रदय तयार करणारा कारागीर आहे, ज्याचं काम नवनवीन कृत्रिम ह्रदयांची निर्मीती करण्याचं आहे. ह्या प्रयोगशाळेत बनवल्या जाणारया ह्रदयांमध्येही कुठले विचार आणि कुठल्या भावना भरायच्या यावर पक्षकार्यालयाचं कसं नियंत्रण आहे यावर तो कवितेत निषेध व्यक्त करु पहातो. कविता सुरु होते ती सोमवारी जेव्हा आपल्या स्वत:च्याच मित्राला वाचवण्यासाठी तो एक संवेदनशील विचारांचं ह्रदय त्याला बसवू पहातो पण त्या तसल्या ट्रबलमेकर ह्रदयावर जप्ती येऊन त्याला स्वातंत्र्याची आस संपलेली गुलाम ह्रदय बनवण्यासाठी दबाव आणला जातो. त्यानुसार बनवलेल्या गुलाम प्रव्रुत्तीच्या ह्रदयांना विकण्यासाठी बाजारातही आणलं जातं आणि रविवारी शेवटच्या दिवशी, कवीच्या या अभुतपुर्व शोधासाठी त्याची सर्वत्र वाहवा केली जाते. हताश झालेला कवी उद्या येणारया नव्या सोमवारी पुन्हा नव्याने काम सुरु करण्याचा निश्चय करतो.
कविता साधीशी असली तरी महत्वाची आहे. ऑरवेलच्या १९८४ या कादंबरीच्या जातकुळीतली ही कविता उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य ठरु शकते, कारण आपल्या देशात ह्रदयसम्राटांची कमी नाही!!!
घुसमटला त्याचा श्वास
काळे निळे झाले वाळले....
त्याचे ओठ...
नवं ह्रदय....याला नवं ह्रदय बसवा
नाहीतर जगणार नाही तो....
डोक्टर हताशपणे म्हणाले.
मी धावलो पक्ष कार्यालयात
परवानगी हवी, नव्या ह्रदयाची.
त्याशिवाय तो जगू शकणार नाही हो.
........
....ते म्हणाले, छे छे
ही कसली ह्रदयं, अगदीच टाकाऊ
ह्रदय कसं हवं, खणखणीत पोलादासारखं
किंवा घटट बसणारया लोखंडी कुलुपासारखं
सांगू ते करणारी ह्रदयं हवीत
छू म्हणल्यावर भुंकणारी.
आरती गा म्हटल्यावर भडभडून गाणारी
सांगितल्याबरोबर बोटे मोडीत
कडकडून शिव्या देणारी....
माझा मित्र तर तिकडे मरतो आहे
ही ह्रदयं मात्र आधीच शापित.....

1 comments:

Captain of the Lost Ship said...

http://archive.thetablet.co.uk/article/22nd-june-1957/6/poets-in-the-pillory

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009