Monday 20 October 2014

एका अमूक गटाने दुसरया गटावर हल्ला केला आणि नंतर दंगली पेटल्या तर त्या गदारोळात आपण नेहमी व्यवस्थेचा रोल हा नेमका कसा विसरतो? पंतप्रधानापासून ते सरपंचापर्यंत जी पदे आहेत ती धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाची पाईक आहेत की नाहीत? मग त्या त्या पदावर बसणारी व्यक्ती कुठल्या धर्माची किंवा जातीची आहे त्यावरुन त्यांनी पुढे घेतलेले निर्णय ठरत नाहीत, किंबहुना ठरु नयेत असे संविधानाला साक्षी ठेऊन म्हणावे लागेल. १९८४ मध्ये झालेलं शिखांचं हत्याकांड घडवून आणणारया सगळ्या लोकांना कायद्याने कडक शिक्षा द्यायलाच हवी होती. ती तशी दिली गेली नाही, त्यासाठी तत्कालिन शासनावर आणि नंतर आलेल्या सगळ्या कोंग्रेस सरकारांवर त्याचा ठपका रहातो. तसेच गोध्रा ट्रेन जाळली गेल्यावर, त्याच्या दोषींना त्वरीत पकडून सजा देण्याचे काम गुजरात शासनाचे होते, पुढे दंगली होणार नाहीत यासाठी एक एक्शन प्लान तयार करुन त्वरीत अंमलात आणणे जरुरीचे होते. ते करण्यात मोदी सपशेल फेल झाले. याउलट शासनाने हत्याकांडात जळून खाक झालेल्यांची जळलेली शरीरं विश्व हिंदू परिषदेच्या ताब्यात दिली, त्यांनी त्याची एक छान सीडी काढून त्याच दिवशी गुजरातेत फिरवली आणि नंतर चिडलेल्या हिंदू जमावाला तीन दिवस मैदान खुलं करुन दिलं. हे कमी की काय म्हणून दंगलीनंतर त्याच क्षेत्रात जाऊन मोदींनी गौरव यात्रा काढल्या. सरकार सत्तेवर येऊन एक वर्षही झालं नसताना गौरव करण्यासारखं असं कुठलं महान काम मोदींनी केलं होतं? थोडक्यात मोदींवर ठेवलेला ठपका हा व्यवस्थेच्या धर्मनिरपेक्षतेवर उभा केलेला प्रश्न आहे. गोध्रातल्या दंगली हा केवळ गोध्रामध्ये ट्रेन जळल्याचा परिपाक नव्हता तर तो गुजरात सरकारच्या धर्माकडे झुकणारया धोरणांचाही तितकाच होता. शेवटी टायटलर काय नी तोगडीया काय, हे केवळ तलवारी वाटणार आणि जनता एकमेकांना भोसकून मरणार.
यापैकी १९८४ असो वा २००२, त्या दोन्ही घटनांतील व्यवस्थेचा रोल खरोखर निपक्षपाती आणि सुव्यवस्थेची घडी बसवण्याच्या द्रुष्टीने होता का ते महत्वाचे. दोन्ही दंग्यात खुनशी पिसाट माणसांनी निरपराध माणसं मारली. मग यासाठी कोणी कितीही तार्किक आणि गणिती शाब्दिक खेळ केले तरी ते जस्टीफाय होऊ शकत नाही. याचबरोबर १९८४ म्हटलं की २००२ चा संदर्भ द्यायचा आणि २००२ म्हटलं की १९८४ चे आकडे मांडायचे हा खेळ म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या निबर मानसिकतेकडे होणारा प्रवास आहे. १०० हिंदू मेल्यावर १०० मुस्लिम मारले किंवा १०० मुस्लिम मेल्यावर १०० हिंदू मारले तर फिटटंफाट होत नसते, तर २०० माणसं विनाकरण मारली गेलेली असतात. म्हणून इतरवेळी निदान ज्या राजकीय नेत्यांना शिव्या घालता त्यांच्यात आणि स्वत:त काहीतरी फरक ठेवायला हवाच. नाहीतर पुढच्या पिढ्या २०१७ किंवा २०२१ ची उदाहरणं देतील आणि ते ऐकायला आपण इथे नसू.

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009