Monday 20 October 2014

आत्ताच लोकसत्तेच्या पहिल्या पानावर न्युज वाचली. बीजेपी नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल.
१)केंद्रातून मोदी,सुषमा स्वराज, वैंकय्या नायडू, उमा भारती,स्मृती इराणी आणि कोणी असतील ते.
२)गुजरातचे २६ खासदार + आनंदीबेन
३)गुजरातेचे ११८ आमदार
४)गुजरातचे २७५ नगरसेवक
महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी इतका जीव तोडणं का? इतकी निर्वाचित पदं सांभाळणारी माणसं आपापली कामं सोडून पक्षप्रचाराला इथे? देशात कुठेही जाऊन पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार कायद्याने आहे हे मान्यंय परंतु एखाद्या जबाबदारीच्या पदाचा पदभार सांभाळणार्‍या व्यक्तींनी आपली जबाबदारी सोडून इतक्या मोठ्या संख्येने प्रचाराची काम करत हिंडावं हे चुकीचं नाही? म्हणजे केंद्रापासून गुजरात राज्यातले सर्व प्रश्न संपले असून आता तिथे काही काम काम उरलेलं नाही म्हणून कार्यालयात माशा मारण्याऐवजी चला महाराष्ट्राकडे, असं काही आहे का? देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात जा, जनतेला गृहीत धरणं हा भारतीय नेत्यांचा राष्ट्रीय गुणधर्म असल्याचे आढळते. तिथे गुजरातच्या बडोद्यामध्ये धार्मिक दंगली सुरू आहेत.(बर्‍याच लोकांना याची माहीती आहे की नाही कोण जाणे. अर्थात ही आपल्या देशभक्त प्रामाणिक मिडीयाची कृपा.) तिथली आपात्कालिन परिस्थिती सांभाळता तर येत नाही पण निदान त्यासाठी प्रयत्न करायचे सोडून ह्या लोकांची इथे 'महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय' त्यासाठी शोधाशोध चाललेली!!
यावर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणतात, 'हि तर भाजपची कार्यपद्धतीच आहे.' म्हणजे समजा उद्या इथे भाजपचं सरकार आलं आणि नंतर गुजरात, कर्नाटक,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदीं राज्यांत निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रातले भाजपचे आमदार आणि नगरसेवक सुद्धा इकडची कामं सोडून तिथे महिनाभर प्रचार करत बसणार का? शेवटी यांचं उद्दिष्टं म्हणजे केवळ आणि केवळ सत्तासंपादन आणि त्यासाठी संख्याबळाचा वापर करुन काहीही. मग सगळीकडे पुर्ण सत्ता मिळाली की त्याच्या जोरावर मुजोरगिरी. मग त्यात शेतकर्‍यांना नाडायचं, एका अमूक आर्थिक वर्गाचं लांगूचालन करायचं, RSS सारख्या संघटनांना सरकारी माध्यमं खुली करुन द्यायची चांगल्या हुषार माणसांची मंडळांवरुन उचलबांगडी करुन तिथे सुदर्शन राव-बात्रासारखे नग बसवायचे यासाठी हवं का पुर्ण बहुमत? या पोस्टचा मुद्दा गुजराती विरुद्ध मराठी अस्मितेचा नाही तर तो जनता विरुद्ध सत्तांध नेते असा आहे. भारताच्या कुठल्याही कोपर्‍यातली कुठल्याही राज्यातली जनता असो, त्यांनी काम करायला निवडून दिलेले कोणत्याही पक्षाचे नेते आपापली कामं सोडून इतरत्र टोप्या-झेंडे मिरवण्याची कामं करत हिंडत असतील तर जनतेने त्यांच्या टोप्या वेळीच उतरवल्या पाहीजेत.

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009