Monday 20 October 2014

रेल्वेभाडेवाढीवरुन मोदी समर्थकांमधलं आणि एकूण जनतेतलंही क्लास डिस्टीब्युशन सरळ सरळ उघड झाल्यागत आहे. अडीज पट भाडेवाढ ज्याचा संसाराचा गाडा झोपवू शकते किंवा ज्याला इतर आवश्यक गरजा टाळून आपला पैसा पास काढण्यामध्ये खर्च करावा लागणार आहे त्यांनी आता या निर्णयाविरुद्ध नाराजी नाहीतर सरळ आवाज उठवायला सुरुवात केली आहे. शेवटी खिशात काही उरतच नाहीये. त्यात जे काही थोडंफार उरलं सुरलं आहे तेसुद्धा इराक युद्धात महागलेल्या डिझेल-पेट्रोल, भाज्या व धान्य फस्त करतायत. पुढे येणारी शुद्ध चोरीच्या स्वरुपातली गॅसची भाववाढ डोक्यावर पिंगा घालतेय. त्यामूळे प्रश्न हा काँग्रेस-बीजेपीच्या सरकाराचा, सुविधा हव्या-नको असण्याचा नाहीच आहे. पैशेच नाही आहेत तर, 'आणणार कुठुन?' हा आहे.
या उलट दुसरा वर्ग म्हणजे नव मध्यमवर्ग किंवा नव उच्च मध्यमवर्ग(यांचं ह्या क्लासमध्ये पदार्पण ही गेल्या दहा वर्षातलंच) ह्यांना ही भाववाढ परवडण्याजोगी आहे. काहीजण नाकं मुरडतील, दोन दिवस तावातावाने चर्चाही करतील पण शेवटी मार्गाला लागतील. यातल्या उच्च मध्यमवर्गाला तर सुविधा मिळणार असतील तर यांची ६००-७०० रुपये देण्याचीही तयारी आहे. गंमत म्हणजे नेमक्या कोणत्या सुविधा आणि कधीपर्यंत मिळणार याच्याबद्दल यांना काहीही माहीती नाही आणि सरकारनेही ही भाववाढ बजेटमध्ये न मांडता ती आधीच मांडून ते परस्पर टाळले आहे पण तरीही यांची आक्रामक भुमिका कोणत्या पायावर उभी आहे हे कळायला काहीएक मार्ग नाही.
४००-५०० रुपये वाढल्याने इतका काय फरक पडतो? नवीन मोबाईल, सीसीडी-केएफसी मध्ये सहज एकावेळेस इतकेच पैसे उडवणारे लोक आता इतका आवाज का करतायत? हे लोक इतकेच पैसे टॅक्सीला देतात मग ट्रेनला द्यायला यांचं काय जात? यांना फुकट खायची सवय झालीये, नुसत्या सबसिड्या पाहीजेत यांना वगैरे वगैरे बर्‍याच कमेंट ह्या वर्गाने दिल्या. ह्या लोकांना पाहिले की फ्रान्सची कुप्रसिद्ध राणी मेरी अँटोनिएट्ची आठवण येते. जेव्हा गरीबीने पिडलेली उपाशी जनता फ्रान्सचा सम्राट सोळाव्या लुईच्या समोर 'ब्रेड' मिळावा म्हणून विनवण्या करीत होती तेव्हा मेरी अँटोनिएट उद्गारली होती की, 'हे लोक ब्रेड का मागतायत? हे लोक केक का खात नाहीत?' गरिबीचा 'ग' सुद्धा माहीत नसलेली ही राणी या तिच्या विधानामूळे कुप्रसिद्ध झाली. ब्रेड आणि केक आकाशातून पडतात अशी तिची धारणा झाली असावी. तसंच रेल्वे भाववाढीच्या निर्णयावर केवळ आपल्याच सांपत्तिक स्थितीचाच विचार करुन तोच नियम सगळ्यांनाच लावू पहाणारे हे महाभाग म्हणजे फ्रान्सची कुप्रसिद्ध राणी मेरी अँटोनिएट सारखे आहेत. ही पुढेपुढे उच्च मध्यमवर्ग आणि कनिष्ट मध्यमवर्ग-कनिष्टवर्ग यात अजूनच वेगाने वाढत जाणार्‍या सामाजिक-राजकीय आणि आर्थिक दरीची नांदी आहे

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009