Read More

Tuesday 21 October 2014

बीजेपीला जर का १३५ वगैरे जागा मिळाल्या असत्या तर शिवसेनेला आता जितकं महत्व आलंय ते आलं नसतं. पवारांनी आता खेळलेला शेवटचा पत्ता सुद्धा त्यांना खिशातून बाहेर काढता आला नसता. पत्रकार अपक्षांना कव्हर करत नी वेगवेगळ्या थेअर्‍या मांडत बसले असते. ठाकरे-पवारांकडे कोणी फारसं फिरकलंही नसतं. जसं आता सध्या काँग्रेसकडे कुणी पत्रकार फिरकत नाहीयेत. राष्ट्रीय निवडणुका असोत वा राज्यांतल्या, छोट्या प्रदेशिक पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. सेनेने काढलेला अस्मितेचा मुद्दा त्यांना मनाप्रमाणे सीट्स देउ शकला नसला तरी तारून गेलाय. सेना-राष्ट्रावादी या प्रादेशिक पक्षांचा परफॉर्मंस का काही वाखाणण्याजोगा नाही. केवळ बीजेपीचा रथ थोडक्यासाठी रोखला गेल्याने यांना महत्व आलंय. शेवटी सत्ताकारणात नियम एकच, 'ज्याची जितकी न्युसंस व्हॅल्यु तितकंच त्याला महत्व जास्त'
आता सध्या ही वॅल्यु उद्धवकडे सगळ्यात जास्त आहे. तर पवार आपली न्युसंस वॅल्यु टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. बाकीचे पक्ष इव्हन महायुतीतले छोटे मित्रपक्षसुद्धा मायनसमध्ये गेलेत. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर विनायक मेटेंपेक्षा पर्फेक्ट उदाहरण नसेल.
Read more

Monday 20 October 2014

राज ठाकरे - २

आजही महाराष्ट्राच्या राजकारणात राहून इतकी वर्ष बेरजेचं राजकारण न करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण राज ठाकरेंच्या सिझनल पॉलिटिक्समुळे ती त्यांना पुरेशी कॅश करता आलेली नाही. अनेक लोकांच आक्षेप असतो की राज ठाकरे निवडणुका आल्या की दिसतात ,बाकी महिनोंमहिने गायब असतात. त्यामूळे राज ठाकरे सिरियस राजकारण करत नाहीत असा सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा कयास झाला, त्यामूळे त्यांना सिरियसली घेणं कमी केलं गेलं.
२००९ च्या निवडणुकीआधी मुंबईतल्या लोंढ्यांचा प्रश्न,रेल्वे, पाणिमाफिया, मुंबईत होणारी घाण, अन्नपदार्थातील भेसळ इत्यादी मुंबईकरांच्या रोजच्या दैनंदिन वेळापत्रकात नजरेसमोर वावरणारे मुद्दे घेतले होते. पण निवड्णुकीनंतर हे मुद्दे हळहळू मागे पडले. टोलसारखा मुद्दा कोणत्याही पक्षाने फार काळ नाही घेतला. त्यांचे लागेबांधे असतील किंवा त्याला रेल्वेच्या मुद्य्याइतकी धार नसल्याने न्युजवॅल्यु नसावी. टोल भरणार्‍या जनतेनेच ती आंदोलनं कोल्हापूर, नवी मुंबई सारख्या ठिकाणी लोकल ठेवण्यातच धन्यता मानली. याउलट मोदींनी रेल्वेचं भाडं तिपटीने वाढवल्यावर खूप वेगात नाराजी पसरली. पण शिवसेना आणि मनसे आपल्या मोदीसमर्थनाच्या भुमिकेमुळे तिथे फिरकू शकले नाहीत. माणिकराव ठाकरे आदी पक्षकार्यालयात घर करुन वास्तव्य करणारे कॉंग्रेसी नेते रेल्वे आंदोलन वगैरे करताना आणि लोकं जमवताना दिसले.
नाशिक हातात आल्यावर तिथे खूप काही करता आलं असतं पण ते केलं गेलं नाही. त्याबद्दल बोलतानाही ठाकरे केवळ अमूक पार्क तमूक पार्क बोलत राहीले. ते वाईत नाही पण पार्कची गरज प्रकर्षाने भासण्याआधी रस्ते-वीज-पाणी यांसारख्या इतर मुलभूत गरजा आहेत. लोकांना त्यात इंट्रेस्ट आहे. त्यावर फोकस करणं आवश्यक होतं. नाशिकला कमिशनर नाही ही ओरड गेले सात महिने करत राहीले असते तरी लोकांना तो मुद्दा पटला असता, पण इलेक्शनआधी येऊन तसा युक्तीवाद करणे हे काहीसे पचनी पडले नाही. थोडक्यात मार्केंटिंगच्या जमान्यात जिथे मोदींसारखे नेते आपले कुटूंबीय्,आपले कपडे, आपल्या लकबी यावर कॅमेराचा सतत फोकस ठेवताना दिसतात. ते पटो वा न पटो, तरी करायलाच हवं होतं. राज ठाकरेंना नाशिक मॉडेल अजूनपर्यंत समोर ठेवता आलं नाही आणि त्याची मार्केटींग ही जमली नाही. शेवटी लोक जितकी जास्त अपेक्षा ठेवतात तितकाच त्यांचा अपेक्षाभंगही तीव्र असतो. 'राज ठाकरे नुसतं बोलतो, पण करत तर काहीच नाही' हे वाक्य मनसेवर टिका करताना वापरलं गेलेलं सगळ्यात कॉमन कारण होतं. त्याची परिणती १३ सीट्स वरुन १ सीट्स येण्यावर झाली.
नको तेव्हा मोदी समर्थन, नंतर केलेली मोदी टिका, शिवसेनेवरची टिका नंतर हळूहळू तीही भुमिका बदलणं ह्या मुळे मुळात कन्फ्युज असलेला वोटर अधिकच कन्फ्युज करुन टाकला. कन्फ्युज माणसं पोलराइझ्ड होऊ शकत नाहीत. कन्फ्युजन मधून बाहेर पडण्यासाठी ते दुसर्‍या पोल्सचा आधार शोधतात. लोकांनी तेच केलं. आधी मोदीलाटेत पोहताना मराठी अस्मितेचा मुद्दा विसरलेल्या शिवसेनेनं युती तुटल्यावर केवळ काही दिवसांतच अस्मितेची चादर आपल्याकडे ओढून घेतली. केवळ मराठीच्या मुद्द्यावर साठच्या वर सीट्स इतक्या कमी वेळात निवडून आणल्या. मला चांगलं आठवतंय लोकसभेच्या वेळी सुद्धा मनसे वोटर भयंकर कन्फ्युज होता. मोदीचं गारुड तरुणांच्या मनात उतरलं होतं. काहीही करुन मोदीच पीएम झाले पाहीजेत हा अ‍ॅटीट्युड होता. तेव्हा मनसेला वोट करणारे आणि मनसेकडून वोट मागणारे दोन्ही संभ्रमात होते. कारण लोक म्हणायचे, 'अरे मोदीला पीएम करायचंय ना मग आम्ही सेनेला वोट देऊ. तुम्हाला देऊन काय उपयोग? तुमचा बाहेरुन पाठींब्यापेक्षा सेनेचा आतून पाठींबा आहे ना. उगाच तुम्हाला वोट देऊन सेनेच्या सीट्स कमी होतील आणि मोदींना नुकसान होईल.' तेव्हाच जाणवलं की प्रादेशिक पक्ष प्रादेशिक राहून नॅशनल पॉलिटिक्स करु शकत नाहीत. त्यांना असं तळ्यात मळ्यात रहाता येत नाही. एक प्लॅटफॉर्म निवडावा लागतो. ती राज ठाकरेंची घोडचूक होती. लोकसभा इलेक्शनने त्यांचा दबदबा साफ कमी केला.तेच विधानसभेत कंटीन्यु राहीलं. आता पुढे काय होतं ते बघणं इंट्रेस्टींग ठरेल. गेलेल वोटस आणि आटलेला दबदबा राज ठाकरे पुन्हा पुनरुज्जीवित करु शकतील की नाही किंवा कसे, ते येत्या काळातच कळेल. बाकी राज ठाकरेंना आपल्या संघटनेची दुसरी फळी बांधावी लागेल. राज ठाकरेंच्या भाषणांनंतर जेव्हा उमेदवाराचं नाव पुकारलं जात, तेव्हा केवळ हात जोडत पुढे येऊन हसण्याइतपत असणारा उमेदवाराचा रोल आता वाढला पाहीजे. पुढे तिसर्‍या-चौथ्या फळीत संघटना तळापर्यंत पेनेट्रेट होत जाणं आवश्यक आहे. शेवटी भक्कम संघटना हा कोणत्याही मास लिडरच्या जनाधाराला आधार देणारा सांगाडा असतो. आपला मुद्दा घेऊन जनमत तळापासून ढवळून काढायला ठाकरेंना संघटनाबांधणी जमेल तितल्या लवकर करावी लागेल.
           इतर पक्ष जुने आहेत. त्या पक्षांच्या स्थापनेपासून अनेक माणसं, अनेक विचारप्रवाह, घटना , निवडणुका आणि भुमिका स्पर्श करुन गेल्या असतील. ती जडणघडण सिलेक्टिव्हली वाचायला मिळते. तो काळ काही बघता येत नाही. पण मला मनसे किंवा 'आप' पार्टीचं पॉलिटिक्स अनालाईझ करणं महत्वाचं वाटतं. कारण हे आता उदयास आलेले पक्ष आहेत. इतरांशी कंपेअर करता आताची बदललेली पॉलिटिकल मांडणी आणि कंसेप्ट निरखण्यासाठी हे दोन्ही पक्ष टेस्ट मॉडेल ठरावेत. उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या प्रकारची निष्ठा बाळगणारा कार्यकर्ता बाळासाहेबांना मिळाला तो राजला मिळणार नाही. कारण वृत्तीत होत गेलेला बदल. याउलट आताची ओपिनिअन मेकिंगची साधनं आणि वेग ७० च्या दशकातल्या पॉलिटिक्समध्ये नव्हता. त्यामूळे जनतेच्या मनातली पॉलिटिक्सची दिशा,समज आणि निकड कशी बदललीये हे बघणे इंट्रेस्टींग ठरते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुण वोटर हा राजकारणाच्या माध्यामतून इन्स्टीट्युशनलाईझ होतोय का? एकेकाळी कामगारांच्या प्रश्नावर खेळलं जाणारं राजकारण आज सीट्नंबर आणि टिकात्मक नेगेटिव्ह पॉलिटिक्सवर खेळलं जातंय. उद्या यातल्या मुद्द्याचं स्वरुप काय असेल याचा अंदाज घेणं रोचक आहे.
         
Read more
पब्लिकला आता वेळ देऊन काही वाचण्यामध्ये काहीएक इंट्रेस्ट उरलेला दिसत नाही. सोशल साईट्स आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचा प्रोपोगंडा हाच मुख्यत्वे तरुण व्होटर्सचा ओपिनिअन मेकर आहे. मिडीयातल्या चर्चा-विषय आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे मॅसेज यातही काही विशेष फरक नाही. सगळी ओपिनिअन मेकिंग ही सत्तेच्या गणितांभोवतीच फिरताना दिसते. लोकांनाही आपले प्रश्न सोडवण्यापेक्षा सेना-बीजेपी-राष्ट्रवादीचे काय होईल यात रस आहे. अमूक आमदाराला सिट मिळाली पाहीजे, त्याने किती वाटले, किती सभा घेतल्या इत्यादी मुद्द्यामध्येंच कौतुकाचा प्रसाद फिरतोय. निव्वळ पॉप्युलॅरिटी बेस्ड राजकारणाला लोकांचीच पसंती असल्याचे जास्त आढळते. 'समाजकारणासाठी राजकारण' ही कन्सेप्ट शाळेत नागरिकशास्त्राच्या पेपरात २-३ मार्क मिळवण्यापुरती उरली आहे. जनतेनेच समाजकारण राजकारणापासून डिटॅच केलंय.
    हे निरिक्षण अण्णा आंदोलनापासुन मला जाणवायला लागलं, जेव्हा एरवी मुंबई-दिल्लीसारख्या ठिकाणची एकमेकांना तोंड दाखवायलाही वेळ न मिळणारी माणसं सुट्ट्या वगैरे घेऊन प्रभातफेर्‍या काढत होती, सोशल साईट्वर तावातावाने फोटो आणि रेडीमेड मॅसेजेस शेअर करत होती. तेव्हा मुद्दाम वेगवेगळ्या स्तरातल्या बर्‍याच जणांशी बोललो. तेव्हा जाणवलं, ही माणसांचा कॉंग्रेसवरचा राग आहे. 'जनलोकपाल' म्हणजे काय याची अतिशय नगण्य लोकांना माहिती होती. इव्हन या आंदोलनाचं राजकीय फलित काय? याचाही विचार नव्हता. केवळ 'अरे भाई, कोई तो कुछ तो कर रहा है ना. बस्स' हा दॄष्टीकोन आढळला. तेव्हा मोदी नावाचा माणूस गुजरात मध्ये आहे वगैरे हा बर्‍याच लोकांसाही एक जनरल नॉलेजचा प्रश्न असावा. नंतर मुळात जनाधाराचा बेसच तात्कालिक क्षोभ असल्याने त्याला भक्कमपणा असा आलाच नाही. मुळ मुद्दा तर जनतेच्या गावीही नव्हता. इतक्या लाखोंच्या संख्येने लोकं मोबिलाईझ झाले तरी आंदोलन तिथेच राहीलं, अण्णांचं नाव आता बॅकग्राउंड्ला कुठेतरी आहे.
    नंतरच्या काळात आप पार्टी पण आली बराच गाजावाजा झाला. कौतुकाचे रेडिमेड मॅसेजेस फिरले. पण सत्तास्थापनेत बीजेपीला उपाशी रहावं लागल्याने केजरीवाल पुन्हा हिटलिस्टवर आला. आजच्या घडीला देशात सगळ्यात जास्त प्रोपोगंडा नेटवर्क एकाच पक्षाचं-संघटनेचं सगळ्यात
स्ट्राँग आहे. त्यांनी ते पिळून सुकेस्तोवर वापरलं. मला चांगलं आठवतंय प्रशांत भुषणच्या काश्मिरच्या वरच्या कमेंटस, त्याची NCERT ची केस, केजरीवालचा फ्लॅट, तो कोण एक माणुस फुटला तर त्याने काय तरी केलेले पर्सनल आरोप इत्यादी असतील नसतील तितके सगळे मुद्दे रोजच्या रोजच्या वॉलवर आदळत होते. २-३ महिन्यापुर्वी ज्यांनी शीला दिक्षीतला हरवणार्‍या केजरीवालचं जल्लोष केला तेच आता तो कस्सा वाईट्ट आहे इत्यादी बोलु लागले. नंतर त्याचं जनलोकपाल बिल आणि स्वराज बिल पुर्णपणे दुर्लक्षित झालं. (युट्युबवर वेळ काढून या बिलाचा दिल्ली विधानसभेचा ठराव जमल्यास पहावा. हर्षवर्धन आदी मंडळींची किळस न आली तर नवल.) नंतर सत्ता सोडलयावर तो वेगाने व्हिलन नं. १ झाला. मग मोदींना राम करायचा तर रावण-कुंभकर्ण हवेतच. सगळं ठरल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडलं.
     महाराष्ट्रातही ओपिनिअन मेकिंग व्हॉट्सअ‍ॅपवर बरीच झाली. मुंबई-विदर्भ आणि मराठी अस्मिता हे मुद्देवाले मॅसेज शिवसेनेच्या नेटवर्कने फिरवले. खुद्द शिवसेनेची व्हिजन डॉक्युमेंट आणि मनसेची बहुचर्चित ब्लू प्रिंट हे दोन्ही लोणच्यासारखे ताटात पडून नंतर खरकट्यात गेले. पुन्हा सगळी ओपिनिअन मेकिंग आणि सगळी चर्चा ही केवळ सत्ताकारणाच्या गणितांवरच झाली. या चारही इव्हेंटच्या रिंगांतून उड्या मारत आलेले अनेकजण आपल्या सगळ्यांच्या सभोवती किंवा आपल्यातलेच एक असतील. आधी अण्णा, मग केजरीवाल, नंतर मोदी आणि आता उद्धव अशी भुमिका बदलत जुन्या भुमिकांना तिलांजली देऊन डिलिट करणारे खूप आहेत. या बिनशिडाच्या नावा येणार्‍या प्रत्येक लाटेवर स्वार झाल्या. प्रत्येक लाटेला दिलेल्या समर्थनाची त्यांची कारणंही एकसारखी नाहीत. थोडक्यात आता राजकीय मत हे पॉप्युलर नेते आणि मुद्दे यांच्यावर अवलंबून आहे. मग कोणाला पॉप्युलर करायचं आणि कोणाला काळं फासायचं यावर ह्याचा कंट्रोल मिडीयाचा आहे. आजही इथे कोणतंही मोठं उस्फुर्त जनआंदोलन उभं रहाणं आणि ते टिकणं ही प्रचंड लोकसंख्येच्या लोकशाहीत अशक्यप्राय गोष्ट वाटते.

Read more
केवळ राज ठाकरेंचा अ‍ॅटीट्युड'च' त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे असं मला नाही वाटत. त्यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ग्राफची अनेक कारणे आहेत. अ‍ॅटीट्युड हे मेजर कारण आहेच पण इतरही बरीच आहेत.
राज एका ठराविक वर्गाला पोलोराईझ करुन हुकमी राखीव मतं ठेवण्य
ात अयशस्वी झाला. त्यात मोदीलाटेने प्रादेशिक पक्षांची स्पेस खाल्ली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तर सेना गेल्या वर्षभरापर्यंत जवळपास पण नव्हती पण अचानक सगळा सिट शेअरींगचा बाजार करुन सवरुनही मराठी मुद्दा केवळ १५ दिवस उचलून त्यांनी त्यावर मतेही मिळवली. आता पोलोरायझेशनचा जमाना आहे. राज ना धड मुसलमानांना जवळ करु शकला, ना मराठी मतांना, ना दलितांना. त्याने राम कदम सारख्यांना पाठीशी घातले, आठवलेंना विनाकरण फुटेज देऊन मिमिक्रीयुक्त टिका करत बसला. जेव्हा मोदींनी मुंबईत रेल्वेचे भाव वाढवले तेव्हा मनसे वाले गायब होते. तेव्हा आला असता तर शाईन झाला असता. सिझनल पॉलिटिक्स महागात पडलं.
बाकी आडमुठ्या भुमिकेमुळे कुणाशी धड युति केली नाही. नाहीतर दुसर्‍यांच्या आधाराने आपली वेल वाढवली असती वगैरे...बाकी नोबडी केअर्स अबाऊट भुमिका-वुमिका. लोकं लवकर विसरतात. त्यात परत त्वेषाने ज्या भुमिका घेतल्या त्याही बदलल्या. सेना-मनसेचा वोटर वेगळा आहे. उपाशी राहून अस्मितेच्या मुद्य्यांवर व्होट करणारा आहे. अशा भुमिका बदललेल्या त्यांना आवडत नाहीत. हे मी जितक्या मनसे सपोर्टर मित्रांशी बोललो तेव्हा जाणवलं. लोकांनी जितक्या जास्त अपेक्षा ठेवल्या, त्यांचा तेवढाच मोठा अपेक्षाभंग नाशिककडे बघून झाला. आता मनसे राजकीयदॄष्ट्या अडगळीत आहे. जनरली स्थापनेचं कारण बंडखोरी असेल तर तीच त्या पक्षाची न्ञुजवॅल्यु जास्त असते. तेच मिडीयानेपण केलं. ब्लू प्रिंट्बद्दल हार्डली २-३ प्रश्न विचारले गेले असतील. सगळे प्रश्न सेना आणि मोदीवरच होते. बाकी राज ठाकरे मिडीयावर भडकतात त्याचं मला पार काही वाटत नाही. अतिशय फालतू प्रश्न वारंवार विचारणे, केवळ टिआरपी लाईन्स शोधणे आणि मुलाखतकर्त्याने सुपारी घेतल्यासारखी मुलाखत घेणे हे प्रकार मला खूप जास्त आढळले. कंपेअर करायला माझा कट्टावर देवेंद्र फडणवीसला त्यांच्या आयातीबद्दल जितके छान गोग्गोड प्रश्न विचारले गेले आणि त्याची आपदधर्म-शाश्वतधर्म असली थिल्लर मांडणी करुन त्याने ते हसत खेळत टोलवले हे पहावं लागेल. मिडीयावाल्यांनी तर असल्या मुद्द्यांवर बीजेपीला रडवल्म पाहीजे. पण पोसणार्‍या बापाला गुणी पोरं रडवत नाहीत!!
Read more

निवडणुकांचे निकाल तर लागले. आता लक्ष आहे ते सत्तास्थापनेच्या गणिती करामतींचं. दुसर्‍या क्रमाकांचा पक्ष म्हणून पुढे शिवसेना काय करते हे आता इंट्रेस्टींग आहे. माझ्या मते, शिवसेनेनं आता विरोधी पक्ष म्हणून राहणं त्यांना लाँग टर्म मध्ये जास्त फायदेशीर आहे. मुंबई-कोकण-नाशिक पट्ट्यातला त्यांचा खास मतदारवर्ग आणि हे मतदार ज्या मुद्यांमुळे प्रभावित होतात ते प्रामुख्याने अस्मितावादी मुद्दे आहेत. या मतदारांनी लोकसभेत मोठ्या उत्साहाने मोदींसमर्थनची घेतलेली भुमिका केवळ चारच महिन्यांत खास शिवसेनेसाठी आणि मराठी अस्मितेसाठी बदलली आहे. आजही शिवसेनेत असलेले अनेक मित्र आणि ओळखीचे काहीजण त्यांच्याच जुन्या मतांबद्दल बोलायचं टाळतात, नाहीतर वरमतात. 
बाळासाहेब ठाकरे सक्रीय असताना तरी सेनेची ब्लंट पॉलिटिक्सची इमेज वोटर्स मध्ये आहे. ती पुढेही तशीच ठेवायची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर रहाते. सत्तेत रहाण्यासाठी कोणालाही कधीही आणि कितीही पाठिंबा द्यायचा, कोणाला कुठे पाडायचा इत्यादी इत्यादी राजकारणाचे पेटंट राष्ट्रवादीकडे आहे. हेच उद्धव ठाकरे करायला गेले तर १९९९ मध्ये जसं पवारांनी बनवलं आणि मग पचवलं (नंतर तेच रवंथ करताना घशात अडकलं) तसं उद्धव ठाकरेंना जमणार नाही. शेवटी दोन्ही व्होट बॅ़ंकाच्या मानसिकतेत फरक आहे. पवारांनी ग्राउंड लेव्हलवरचं लोकल राजकारण व्यवस्थित हातात ठेवलंय. उद्धव ठाकरेंची भाषणं आणि त्यातले मुद्दे हे अस्मितावादी आणि भावनिक होते. त्यात त्यांनी इतिहास आणला, त्यातली पात्रं आणली, बाळासाहेब आणले, युतीचा नॉस्टॅलजिया, मुंडे-महाजन, विदर्भ-मुंबई इत्यादी गोष्टी आणल्या. हे मुद्दे आता लगेच असे अडगळीत टाकता येणार नाहीत. तसं केलं तर ज्यांना अस्मितेचा मुद्दा महत्वाचा वाटतो त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. त्यातून व्होट बँक ड्रेन होण्याचा धोका रहातोच. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर बेळगावचा ताजा मुद्दा यांची लिटमस टेस्ट म्हणून बघता येईल. बाकी देशभरात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीची क्रेडीबिलिटी साफ संपलेली आहे. लोक यांना कुठेही सिरियसली घेत नाहीत. या लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करायची सवय नाही, करायला गेले तर जनतेची साथ मिळणं मुश्कील. पण सेनेकडे ती क्रेडीबिलिटी अजून आहे. त्यांनी ती पुर्णपणे वापरुन घ्यायला हवीये. सेनेनं नाकारलं तर भाजपची आताही कोंडी होऊ शकते. पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जाणं त्यांना भाग पडू शकतं. त्यातून पवारच भाजप चालवतात असल्या कॉमेडी थेअरीला उगाचच पाठपुरावा मिळायची शक्यता जास्त आणि त्यातून सेनेला सहानुभुती मिळेल ते वेगळंच. विरोधी पक्ष म्हणून राहीले तर पॉलिटिकल स्पेस मिळवण्यासाठी कोणत्याही आडकाठीशिवाय भाजपशी समोरासमोर स्पर्धा करता येऊ शकेल, पण २४ सिट्स पुरता पाठींबा देण्यासाठी सत्तेत गेले तर भाजप वेगाने सेना पोखरणार आणि हतबल म्हणून बघत बसण्याशिवाय त्यांच्याकडे करण्यासाठी कोणताही पर्याय किंवा हिंमत उरलेली नसेल.
Read more

जेव्हा काही महिन्यापुर्वी आयसिसने इराकमध्ये मांडलेल्या उच्छादाची परिसीमा गाठली गेली होती, तेव्हा जगभरात क्रूड ऑईलचे भाव भडकले होते. आपल्या देशात पेट्रोल-डिझेलचा वापर ट्रान्सपोर्टमध्ये भरपूर होत असल्याने आपल्याकडे ऑईलसकट भाजीपाला, धान्यांपासून दैनंदिन वापरातील अनेक महत्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला जाऊन भिडले होते. त्याच्यावर देशात काही काळापुरती बोंबाबोंबही झाली. तेव्हा पंपंनी इराक-सिरियाकडे बोट दाखवून आपले हात वर केले होते, ते खरंही होतं. कारण भारताचा ऑईल मार्केटवर पुरेसा प्रभाव नाही. तिकडे परिस्थिती चिघळली की आपल्याला नाक मुठीत धरुन आहे त्या किंमतीत ऑईल खरेदी करावे लागते.
आता मोदींना १०० दिवसांत काय केलं असं सतत विचारलं जात असताना मोदींनी सांगितलं की, मी क्रुड ऑईलचे भाव खाली उतरवून दाखवले!!! हे हास्यास्पद विधान भलतंच सिरीयसली घेऊन सभांमध्ये मोदी-मोदी चा जयघोष नेहमीप्रमाणे भक्तांनी केलाच. ह्यात लोकांना इतकं साधं कसं कळत नाही की मोदी जर किंमतीतली वाढ कंट्रोल करु शकत नाहीत, तर किंमतीतली घट त्यांनी कशी घडवून आणली? आता जगभरात क्रूड ऑईलच्या किंमती उतरत आहेत, याची प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे,
१)इराण आणि लिबियातून मार्केटमध्ये क्रूड ऑईलची वाढलेली आवक
२)युरोपियन इकॉनॉमीत सुधारणा होण्याची सध्यातरी शक्यता नाही. थोडक्यात तिथून मागणी वाढण्याची शक्यता कमी
३)अमेरिका,रशिया आणि चायनाच्या मागणीत घट
४)या सगळ्या कारणांमुळे मार्केटमध्ये ऑईलचा पुरवठा जास्त आणि मागणी कमी झालीये. म्हणून इराण आणि सौदी अरेबिया या दोन प्रमुख उत्पादक देशांमध्ये डिस्काउंट वॉर सुरु झालं आहे.
या सगळ्या कारणांमुळे जगभरात ऑइलचे भाव वेगाने खाली उतरत आहेत, यात मोदींचा दुरान्वयेही संबंध नाही. पण नेहमीप्रमाणे त्याचंही क्रेडीट ओरबाडून घेण्यासाठी पंपंनी जराही वेळ दडवला नाहीये. असो. पण त्यांची मांडणी अशी की, भाव वाढले तर ते 'त्यांनी' वाढवले आणि भाव कमी झाले तर ते 'मी' कमी केले. यामूळे भक्तांना भक्तीसाठी अजून एक आरती कंपोज करण्यासाठी खोटा विषय मिळाला. चालू देत भजनं.
Read more
 

Neo-paradoxes Design by Insight © 2009