Monday 20 October 2014

'चे गव्हेरा' वर २००८ साली प्रदर्शित झालेला स्टिव्हन सोडरबर्गचा 'चे' ह्या सिनेमातला एक प्रसंग.
प्रस्तुत प्रसंगात पत्रकार लिसा हॉवर्डने १९६४ साली हवानामध्ये घेतलेल्या 'चे गव्हेरा'च्या मुलाखतीतला एक प्रश्न......
लिसा: तुमच्या मते, असा कोणता नेमका गुण आहे की जो क्रांतीकारकामध्ये असणं आवश्यक आहे?
चे : प्रेम.
लिसा : प्रेम?
चे : होय, प्रेम. मानवता, सत्य आणि न्याय याच्याविषयी असलेलं प्रेम! खरा क्रांतीकारक तिथे आपोआप जातो जिथे या गोष्टींची कमतरता भासते.
हे शेवटचं वाक्य चे ने अ़क्षरशः खरं खरुन दाखवलं. क्युबा स्वतंत्र झाल्यावर तो अनेक देश फिरला. आधी काँगोत आणि मग बोलिव्हियामध्ये जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी तो निघून गेला. तिथेच CIA ने त्याची हत्या करवली.
चे गव्हेराचं हे वाक्य हिंसेतल्या अहिंसेची परिभाषा स्पष्ट करतं. हे वाक्य म्हणजे 'एका देशाचा दहशतवादी तो दुसर्‍या देशाचा क्रांतीकारक' ह्या रिलेटिव्ह युक्तीवादाला दिलेलं समर्पक उत्तर आहे. म्हणून, तुम्हाला क्रांती करायचीय? तुम्हाला बदल हवाय? तर, मग तुम्हाला आधी आपल्या क्रांतीच्या गरजेला या कसोटीवर तपासून पहायला हवं, की आपल्याला अभिप्रेत असलेली क्रांती ही मानवता, सत्य आणि न्यायाच्या भक्कम पायावर उभी आहे का? जर ती असत्य, द्वेष, उन्माद, आणि सूडाच्या भावनेवर आधारित असेल तर तो दहशतवाद झाला. (हिरवा,पिवळा,लाल,भगवा हे रंग ज्याचे त्याने पडताळून पहावेत.) जगाच्या आणि आपल्या सद्य परिस्थितीत चे गव्हेराचं हे वाक्य खर्‍या क्रांतीकारकांपेक्षा धर्मा-जातिधारित समाज,संस्था आणि सरकारं यांच्या दहशतवादी वृत्तीची चाचपणी करण्यासाठी जास्त कामाला यावं यासारखं दुर्दैव नाही.

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009