Monday 20 October 2014

वेद,उपनिषदे आणि पुराण .....
हळूहळू मनुस्मृती आणि विष्णूचे दहा अवतार...
आल्याआल्या चारच दिवसात शिक्षणातुन धार्मिक अजेंडा प्रसवण्याकडे पावलं उचलतायत. गंमत म्हणजे याला त्या, प्राचीन भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न असं म्हणतायत. भारतीय संस्कृती म्हणजे एका अमूक धर्माचीच संस़्कृती आणि मुल्यं असा अभिनिवेश एका ठराविक विचारधारेचे लोक स्वतःच्या (प्रसंगी दुसर्‍यांच्या) शिरा ताणूनताणून मांडत असतात. मग थोडक्यात, भारतीय धर्मनिरपेक्षता ही मुळापासूनच उखडून टाकण्यासाठी बीजं पेरायची पद्धत आता व्यवस्थेत शिरकाव करणार का? इतिहासातुन आलेली अस्मिता ही आज किती लागू आहे? आणि त्याच्या आधारावर उभ्या रहाणार्‍या पिढीची मानसिकता ही किती लागू असेल? हे प्रश्न काही डोक्यातुन जाता जात नाहीत. असो. आता हे सगळं चित्र कुठपर्यंत रंगवलं जातं आणि किती सफल होतं ते पहायचं.

आजची पिढी? नेमकी कुठली? शहरातली-गावातली? उच्च-मध्यम-कनिष्ट वर्गातली वेगवेगळी पिढी? वेगवेगळ्या जाती-धर्मांची वेगवेगळी पिढी? आजची पिढी हा शब्द असा सरसकट्पणे वापरता येत नाही. प्रत्येक पिढीची आर्थिक-सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिति वेगळी आहे. त्याचबरोबर त्यांना पडणारे प्रश्नही वेगवेगळे आहेत. अशावेळी सद्य वास्तवातल्या प्रश्नांच्या उगमाची चिकित्सा करुन, ते सोडवण्यासाठी सगळ्यांना लहानपणापासून आधी माणुसकी शिकवायची गरज आहे. 
प्रायमरी आणि सेकंडरी शिकणारी कुठली पिढी स्वतंत्र विचारांची असते? त्यांच्या जगताना घेतलेल्या एक दोन स्वतंत्र विचारांची/निर्णयांची उदाहरणे मिळतील काय? आणि या शाळेत समोर येणार्‍या सिलॅबसमध्ये चॉईस असतो का? चॉईस नसते. समोर जे जे येते, ते सगळे अभ्यास करुन त्यावर परिक्षा द्यावीच लागते. मी वरच म्हटले आहे, की दहावी-बारावी नंतर एखाद्याला धार्मिक शिक्षण घ्यायचे असेल तर तशी निवड त्याला करता येते. पण शाळेत असतानाच त्यांना धार्मिक, तेही एकाच धर्माचे शिक्षण का म्हणून? आणि जर भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी हे सगळे चालले असेल तर, वेदाबरोबर कुराण, बायबल,झरतृष्ट्,ग्रंथसाहिब आणि बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यात समावेश करणार का? थोडक्यात भारतीय संस्कृतीचा केवळ हिंदू संस्कृती असाच अर्थ लावणे हीच मानसिकता यामागे डोकावतेय हीच चिंतेची बाब आहे.शिक्षणाबरोबर उपलब्ध असलेली इतर साधनं कोणती? जरा स्पष्ट करशील काय? कोणती अशी साधने आहेत की जी तरुण पिढीला खरोखर चिकित्सेकडे वळवतायत? आजची पिढी इतकी आधुनिक असती तर जातीवाद आणि त्यातून होणारे अत्याचार-हत्या, घरापासून बाहेर स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्री-भृणहत्या आणि असे कित्येक प्रश्न आज इतके मोठे होऊन भेडसावलेच नसते. त्यामूळे धर्माधिष्ठीत समाजापेक्षा मुल्याधिष्ठीत समाजाची निर्मीती होणे आवशक आहे. त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आधुनिक जगातली माणुसकीकडे नेणारी 'सर्वसमावेशक' बेसिक मुल्य आहेत. ह्या मुल्यांना जात,धर्म,लिंग,वर्ग व वर्ण असली मानवनिर्मित कुंपणं नाहीत. त्यामूळे 'माणूस' घडवण्याची प्रक्रिया शाळेत घडावी, ज्यांची आज भलीमोठी कमतरता आहे.

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009