Monday 20 October 2014

केवळ अमेरिकेचे पॉलिटीक्स आहे म्हणून भारत आणि पाकिस्तानला विभागून नोबेल शांतीपुरस्कार मिळाला. तालिबानी मुसलमानांविरुद्ध जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठीच मलाला ला पुरस्कार दिला गेला, अशा आशयाच्या बर्‍याच पोस्टस आताच वाचल्या. एका पोस्टमध्ये तर मलाला पेक्षा 'निर्भया' ला नोबेल द्यायला हवा होता असंही विधान केलेलं आढळलं.
अमेरिकचं पॉलिटीक्स हे मुख्य मुद्दा बनवून मलालाचं कर्तुत्व कमी होतं का? 'द गर्ल हू स्टूड अगेंन्स्ट तालिबान' अशी मलालाची ओळख सगळ्या जगाला झाली, परंतु आता तितकीच ओळख राहीलेली नाहीये. ह्या शूर मुलीने जी भुमिका घेतली ती तिला पुरेपूर समजलीये आणि त्या भुमिकेचा आवाका भल्याभल्यांच्या समजाबाहेर आहे.तिच्या युनोच्या भाषणात तिने शिक्षण, समानता आणि विश्वशांतीवर भर दिला. स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा तिने तिला त्या फोरमवर भाषण करायची मिळालेली संधी आणि 'मलाला डे' ही संकल्पना जगात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत करणार्‍या तरुण पिढीला समर्पित केली. जगातल्या सगळ्या देशातल्या मुलांना, स्त्रियांना आणि तरुणांना संबोधून केलेलं हे भाषण हे कोणत्याही अस्मितावादी संकुचित दॄष्टीकोनापासून खूप दूरचं आहे. त्याला मानवतेची वैश्विक किनार आहे. मलाला म्हणते, 'एक मूल,एक शिक्षक्,एक पुस्तक आणि एक लेखणी हे जग बदलायला पुरेसं आहे. दहशतवादाचे मुळ हे अशिक्षितपणात आहे केवळ शिक्षणानेच दहशतवादाचा सामना करता येईल कारण, तालिबान्यांना बंदुकांपेक्षा हातात पुस्तक असलेली मुलगी जास्त हादरवते.' मलालावर हल्ला करणार्‍या तरुणाबद्दल काय वाटतं हे विचारलं असता ती म्हणाली, 'मला वाटतं एखाद्याला मारणं खूप कठीण काम असावं कारण जेव्हा त्याने गोळ्या झाडल्या तेव्हा आधी बराच वेळ त्याचे हात थरथरत होते. उद्या तो समोर असताना माझ्या हातात बंदूक आली तरी मी त्याला मारु शकणार नाही. माझी दयेवर श्रद्धा आहे.'
आता अमेरिकेचं पॉलिटिक्स असेलही पण केवळ त्याच्यावर चर्चा करत बसून मलालाचं कर्तुत्व आणि संदेश झाकोळला जाउ नये. मिडल इस्ट मध्ये असे आयकॉन बनणं गरजेचं आहे कारण तिकडच्या जनतेने नाकारल्याशिवाय तालिबान आणि आयसिस सारख्या संघटनांचं हिंसक मार्गाने काहीएक वाकडं होणार नाहीये. उलट हिंसेने मिडल इस्टचे प्रश्न चिघळले आहेत, त्याला कोणाकडेच काही उत्तर नाही. त्यामुळे शिक्षणाचा स्लो आणि स्टेडी मार्ग हा एकच पर्याय आता आहे. मलालाचं आयकॉन बनण्याने एकावेळी बालहक्क, शिक्षण, स्त्रियांचे हक्क, समानता आणि धर्मसंस्थेला आवाहन इतका मोठा एरिया कव्हर होतो. मूळात नीट लक्ष देऊन बघितलं तर जगात कुठेही पुरुषी वृत्तीने केलेली हिंसा हे या सगळ्या प्रश्नांविरुद्ध उभं ठाकलेलं आणि युद्धांना कारणीभूत असलेलं एक महत्वाचं कारण आहे. मलाला मुळे मिडल ईस्ट मधल्या स्त्रियांनी बुरखा सोडुन पुढे कूच करायचं ठरवलं तरी वेगात अचंबित करणारे बदल होतील. त्यासाठी स्त्री हक्कांना आणि शिक्षणाला पाठिंबा देणारे आयकॉन्स निर्माण होणं गरजेचं आहे. लोक मुल्यांपेक्षां व्यक्तीला फॉलो करतात. आज मलाला, मुख्तार माई आणि झान हैते सारखी तमाम मंडळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत करतात तेव्हा आपल्यासारखे लोक खरोखर काहीतरी होऊ शकतं असं रोंमँटिसिस्झम मनात बाळगण्याची हिंमत करु शकतात. आजच्या जगाच्या भयंकर वास्तवात असा आशावाद निर्माण होण्याची प्रेरणा मिळणे हे काही कमी नाही.
जॉन लेनन निघून जायच्या आधी 'इमॅजिन' हे अजरामर गाणं लिहून गेला. मलालाला कदाचित जॉन लेनन किंवा त्याचं इमॅजिन हे गाणं माहित नसेल पण त्या गाण्यात त्याने जे काही सांगितलं ते तिने 'इमॅजिन' केलंय. आपण सगळे कधी 'इमॅजिन' करणार?

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009